Jitendra Awhad | Vision-Mission

कळवा खाडीपूल ते आत्माराम पाटील चौक समांतर रस्ता

कळवा, खारीगाव, पारसिक नगर या परिसरातील वाहतुकीसाठी ठाणे-बेलापूर आणि कळवा-खारीगाव-आत्माराम पाटील चौक हे दोन रस्ते महत्त्वाचे मानले जातात. हे दोन्ही रस्ते खाडी पुलालगत असलेल्या कळवा चौकात येऊन मिळतात. नवी मुंबई, पनवेल, पुणे आणि कोकणातील वाहतुकीसाठी ठाणे-बेलापूर मार्ग महत्त्वाचा मानला जातो. तर मुंब्रा आणि पनवेल भागातील वाहतुकीसाठी कळवा-खारीगाव हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षांत आपल्या परिसरातील नागरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पर्यायाने वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेला कळवा नाका ते आत्माराम पाटील चौक हा एकमेव रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला आहे.

या वाहतुक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून तिस-या खाडीपुलापासून रेतीबंदर येथील आत्माराम पाटील चौकापर्यंत खाडीकिनारी मुंबई-नाशिक हायवेला समांतर तब्बल चार किलोमीटरचा बाह्यवळण (बायपास) रस्ता उभारला जाणार आहे. त्यामुळे कळवा नाका-खारीगाव-आत्माराम पाटील चौक या मुख्य रस्त्यावरील वाहनांचा भर कमी होणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गाने नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना या रस्त्याचा उपयोग होणार आहे.

कळवा खाडीपूल ते आत्माराम पाटील चौक असा ३० मीटर रुंद आणि ३.८५ किमी लांबीचा हा रस्ता असेल. आराखडयानुसार ३.८५ किमी लांबीपैकी १.८५ लांबीचा रस्ता खाडीलगत आहे. रस्त्याचा काही भाग सीआरझेड कक्षेमध्ये येत असल्याने त्या ठिकाणी उन्नत मार्ग उभारणी केली जाणार आहे. एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन यांच्यासोबत या भागाची पाहणी करण्यात आली असून त्यांनी या कामास तत्वत: मान्यताही दिली आहे.