Jitendra Awhad | Andolane

डॉ. जितेंद्र आव्हाड आणि आंदोलने हे समीकरणच आहे. आपल्या आयुष्याची राजकीय तथा सामाजिक कारकिर्द आंदोलनातूनच सुरु करणारे जे काही नेते आहेत; त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचे नाव अग्रक्रमावर आहे. महाविद्यालयीन जीवनातच फी वाढीविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलनरत झालेल्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांची रस्त्यावरची; कागदावरची आणि विधिमंडळातील आंदोलने हा अभ्यासाचा विषय आहे. विविध क्लृप्त्या करुन नवनवीन आंदोलने करणे आणि त्यातून जनहित साधणे ही कल्पकता डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ठायी आहे. अर्थात, आंदोलने ही केवळ रस्त्यावरचीच असतात, असे नाही. तर, आंदोलने ही वैचारिकही असतात. त्यातूनच त्यांनी सन 2000 च्या दशकात ठाणेकरांना वैचारिक खाद्य पुरवणारी अनोखी आंदोलने केली. विविध क्षेत्रातील विचारवंतांना ठाण्यात एकाच मंचावर आणून त्याद्वारे अनेक सामाजिक विषयांना पटलावर आणले. अनेक ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, बडे राजकीय नेते यांना एकाच मंचावर आणून संघर्ष या संस्थेच्या साह्याने वैचारिक मंथन घडवून आणले.

एकीकडे हे वैचारिक मंथन घडवत असतानाच दुसरीकडे सामाजिक आणि जनहिताच्या आंदोलनातही ते आघाडीवर राहिले. जेव्हा ठाणे जिल्ह्यातील पाच लाख अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळेस डाॅ.जितेंद्र आव्हाड हे थेट रेल्वे रूळांवर उतरले. या देशातील सर्वात मोठा रेल रोको त्यांनी घडवून आणला. अनेक तास रेल रोको सुरू असल्याने उत्तर, दक्षिण भारतातील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. अखेर प्रधानमंत्री कार्यालयालाही या रेलोरोकोची दखल घ्यावी लागली. शिवाय, गोरगरीब जनतेच्या डोक्यावरील छत टिकवण्यासाठी सत्तेत असूनही आपल्याच सरकारविरोधात भला मोठा लाँगमार्च काढणारे डाॅ.जितेंद्र आव्हाड हे एकमेव आमदार आहेत. राजमाता जिजाऊंच्या बदनामीविरोधात जेम्स लेन आणि त्याच्या पिलावळीविरोधातील संघर्षाची पहिली हाक डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीच दिली. देशात निर्माण झालेल्या अघोषित आणीबाणीच्या विरोधात सर्वात आधी संविधान मार्च त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर काढला. देशभरातील सर्वच लोकशाहीवादी नेत्यांना एकाच मंचावर आणून त्यांनी संविधान बचाओचा नारा दिला. अखलाख, जुनैद, मोहसीन, तिवारी यांच्यासारख्या निष्पापांना जेव्हा झुंडशाहीने ठार मारले तेव्हा या झुंडशाहीच्या विरोधात नॉट इन माय नेम नावाचे आंदोलन राज्यात डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याच माध्यमातून सुरु झाले. आजही मराठा आरक्षण असो, अगर दलितांवरील अत्याचार असो विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आणि विधिमंडळात सर्वात आधी आवाज डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनच उठवला जातो.