Jitendra Awhad | Journey

प्रवास अवलियाचा...!

शोषित, पीडित, दलित अन्‌‍ अल्पसंख्यांक यांच्यासाठी आश्वासक नेतृत्व म्हणून जर कोणाकडे पाहिले जात असेल तर ते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडेच! कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अत्यंत गरीब अशा कुटुंबात 5 ऑगस्ट 1963 रोजी नाशिक येथे जन्माला आलेल्या जितेंद्र आव्हाड यांना लहानपणापासूनच गरीबी आणि सामाजिक उतरंडीचे चटके सोसावे लागले. घणाचे घाव सोसल्याशिवाय देवपण लाभत नाही, याच उक्तीप्रमाणे पोटाची आग विझवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्या माता-पित्याने मुंबईची वाट धरली. छोट्या-मोठ्या नोकऱ्या करीत वडील कै. सतीश आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या भावंडांना शिक्षण दिले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आईने शिवणकाम करुन मुलांच्या शिक्षणावर कटाक्ष ठेवला. गरीबी मुलांच्या शिक्षणाची शत्रू ठरु नये, या धारणेतून आई कै. लिलावती आव्हाड यांनी कधी धाकाने तर कधी प्रेमाने जितेंद्र आव्हाड यांचे शिक्षण पूर्ण केले. मुळातच बंडखोर असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थी दशेतच सामाजिक कार्याला सुरुवात केली. स्पष्टवक्तेपणा आणि अभ्यासपूर्ण मांडणी ही त्यांच्या वक्तृत्वाची खुबी होती. त्यामुळेच सेंट जॉन स्कूलमधील स्कूल पार्लमेंटमध्ये पंतप्रधानपद पटकावले. पुढे बी.एन. बांदोडकर महाविद्यालयात जिमखाना सचिव म्हणूनही काम करीत असतानाच देशपातळीवर कार्यरत असलेल्या अन्‌‍ राजकारण विरहित विद्यार्थी चळवळ म्हणून नावाजलेल्या ऑल इंडिया स्टुडंट ऑर्गनायझेशनच्या सरचिटणीसपदी त्यांनी काम केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी संघर्षरत असल्यानेच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करुन त्यांनी सन 1981 मध्ये मुंबई विद्यापीठातील सिनेटची निवडणूक जिंकली; अन्‌‍ हा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. 1982 साली त्यांनी फी वाढीविरोधात केलेले आंदोलन सबंध राज्यभर गाजले होते. शिक्षण व्यवस्थेला गुडघ्यावर आणून शैक्षणिक शुल्क कमी करायला लावणारे त्यांचे हे आंदोलन आजही विद्यार्थी चळवळींसाठी मैलाचा दगड आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांनी 1988 साली मास्टर्स ऑफ लेबर स्टडीज्‌‍ हा पदवी अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत पूर्ण केला. पण, शिक्षण कधीच थांबत नसते, या धारणेतून सन 2013 मध्ये आमदार असतानाही महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक चळवळी या विषयावर पीएच.डी मिळविली. संघटनात्मक राजकीय पटलावर डॉ. जितेंद्र आव्हाड या ताऱ्याचा जन्म तसे पाहता सन 1980 च्या दशकात झाला. ठाणे जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास एनएसयूआयच्या प्रदेश सरचिटणीस, अखिल भारतीय एनएसयूआय सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदापर्यंत झाला आहे. दोनवेळा मंत्रीपदे भुषवूनही डाऊन टू अर्थ असलेले हे नेतृत्व आहे. गल्लीतल्या कार्यकर्त्यासोबत सामान्यपणे वावरणारे आणि वरिष्ठ नेत्यांचा सन्मान करणारे हे व्यक्तीमत्व आहे.

साहित्याचा ठेवा

असं म्हटलं जातं की, शिक्षण तुम्हाला जेवायला नव्हे तर जगायला आणि जगवायला शिकवतं. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतीत ही ओळ तंतोतंत लागू होते. कारण, कल्पकतेला शिक्षणाची जोड असली की बदल घडविणे अत्यंत सोपे जात असते. म्हणूनच आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीला अनेकजण नगरसेवक होण्याची मनिषा बाळगत असताना डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शिक्षण मंडळाची कास धरली. ठाणे महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळात कार्यरत असताना त्यांनी ठामपाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. येथूनच सुरु झालेला त्यांचा हा प्रवास साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा अशा अनेक आघाड्यांवर लिलया खेळत राहिला. ठाण्याच्या गडकरी रंगायतन या नाट्यगृहाला साहित्य; संस्कृतीची पंढरी करण्याचे श्रेय त्यांचेच आहे. त्यांनी आयोजित केलेले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कवि, लेखक यांचे परिसंवाद; लावणीपासून कथ्थकपर्यंतच्या नृत्यांचे कार्यक्रम अन्‌‍ शास्त्रीय संगीतापासून बॉलिवूड गीतगायनाचे कार्यक्रम हे ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीत मैलाचे दगड ठरले आहेत.


सामाजिक भान

राजकारण आणि रुक्ष मन, अशी एक सांगड नेहमीच घातली जाते. अर्थात, त्यास अनेक कारणेदेखील आहेत. मात्र, राजकारणापलिकडे संवेदनशील मन बागळणारे व्यक्तीमत्व म्हणून डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडेच बघता येईल. प्रचंड व्यासंग असल्यानेच त्यांच्यात ही संवेदनशीलता आलेली असावी. राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले आदर्श मानून जगणारे डॉ. जितेंद्र आव्हाड हे आजमितीला सवात प्रखर समतावादी नेतृत्व आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महापुरुषांना आपले आदर्श मानून काम करीत असल्यानेच जातीभेद, धर्मभेद या पलिकडे जाऊन मानवतेसाठी संघर्ष करण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच जे का रंजले गांजले; त्यासी म्हणे जो आपुले... या संतवचनाला आपलेसे करुन डॉ. आव्हाड काम करीत असतात.


माणुसकीचे झाड

लोकनेता म्हणजे काय? असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा ठाणे शहरातील डॉ. जितेंद्र आव्हाड या व्यक्तिमत्वाकडे आपसूकच नजर जाते. ज्यांच्या आजोबाने हमालीचे काम केले त्या माणसाला माणुसकी काय असते, हे शिकवण्यासाठी कोणत्याही पुस्तकांची गरज नसते. माता-पित्याचा संघर्ष बघत-बघतच त्या माणसाला माणुसकीचे धडे मिळतात. डॉ. जितेंद्र आव्हाड नावाच्या माणसाला असेच धडे घरातून मिळाले. त्यामुळेच का होईना, सुरुवातीची समाजसेवा आपल्या पत्नीच्या वेतनातून करणारा हा अवलिया पुढे "देणारा" झाला. कोरोनाच्या काळात गोरगरिबांच्या चुलींमधील आग विझू नये, यासाठी हा माणूस रात्रीचा दिवस करून धावत होता. रस्यावरचे बेघर असोत अगर झुग्या-झोपड्यांमधील हातावर पोट भरणाऱ्या श्रमिकांसाठी या माणसाने आपला जीव धोक्यात टाकला होता. कोरोनाग्रस्तांची औषधे मोफत वाटता-वाटता या माणसानेही मृत्युशय्या गाठली होती. आजही शालेय प्रवेश असोत की रुग्णालयाच्या समस्या घेऊन येणारा याचक, तो कधीच मोकळ्या हाताने जाणार नाही, याची काळजी घेण्याचे सक्त आदेश आपल्या सहकाऱ्यांना ते देतात. म्हणूनच डॉ. जितेंद्र आव्हाड या माणसाला "माणुसकीचे झाड '' असेच संबोधन योग्य ठरते.


गांधीबाबांच्या विचारांचा वारसदार अन्
डॉ. बाबासाहेबांचा अनुयायी

एकीकडे हातात काठी घेतलेले गांधीबाबा आणि दुसरीकडे हातात पुस्तक घेतलेले डॉ. बाबासाहेब, हीच आपली ओळख आहे, असे सांगत डॉ. जितेंद्र आव्हाड हे समानतेसाठी झगडत आहेत. गांधींचा वैचारिक वारसदार म्हणून त्यांना का म्हटले जाते, हे जर जाणून घ्यायचे असेल तर फाळणीचा काळ समोर आणावा लागेल. १९४७ च्या फाळणी नंतर चालू झालेले जातीय दंगे थांबवण्यासाठी आधाराला हातात काठी घेऊन, अंगावर पंचा आणि कंबरेला छोटेसे धोतर गुंडाळलेला एक वृद्ध दंगलग्रस्त भागात निडरपणे प्रवेश करतो आणि "आधी मला मारा नंतर इतरांना मारा" असे सांगतो. त्यानंतर दंगेखोर शांत होतात. हीच कृती ठाण्याचा राबोडी भागात घडते. फरक फक्त कपड्यांचा असतो. पेटलेल्या दंगलीत पोलिसांचा विरोध बाजूला सारून एक तरुण बेधडकपणे आत जातो अन काही वेळातच दंगेखोरांना शांत करून बाहेर येतो. जे काम पोलिसांची लाठी- बंदुका आणि अश्रुधुराची नळकांडी करू शकत नव्हती; ते काम केवळ आपल्या वाणीतून करणारा हा तरुण म्हणजे जितेंद्र आव्हाड! ते प्रतिनिधित्व करीत असलेला मतदारसंघही हिंदू- मुस्लिम वस्तीचा; अनेक असामाजिक तत्वांकडून हा भाग कसा अशांत होईल, याची तजवीज केली जात असतानाही येथे शांतता टिकवण्यासाठी गांधी मार्ग अनुसरणारे डॉ. आव्हाड हेच आहेत. दुसरीकडे संविधान म्हणजे आपला प्राण आहे; त्याच्या रक्षणासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, असे म्हणत 'जय जय जय जय भीम' अशी गर्जना करीत लढण्यासाठी डॉ. आव्हाड नेहमीच सज्ज असतात. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, बाबासाहेब यांच्या समतावादी विचारांची कास धरून समानतेसाठी आग्रह धरणारे आणि आपल्या प्रत्येक भाषणात बाबासाहेब सांगणारे जे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नेते आहेत; त्यामधील मुख्य नाव डॉ. जितेंद्र आव्हाड यांचेच घ्यावे लागेल. त्याचवेळी महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवराय आणि जिजाऊंच्या अपमानाविरुद्ध सर्वात आधी रस्त्यावरची लढाई जितेंद्र आव्हाड यांनीच सुरु केली आहे. जेम्स लेनचे 'शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकातून होणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जागतिक बदनामी रोखण्याचे खरे काम डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीच केले आहे. त्यांच्यामुळेच 2004 सालच्या जानेवारी महिन्यात राज्यातल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने जेम्स लेनच्या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घातली गेली.