Jitendra Awhad | Vision-Mission

आत्माराम पाटील चौक ते कल्याण फाटा भुयारी मार्ग

देशभरातील प्रमुख बंदरांपैकी एक बंदर म्हणजे जेएनपीटी! ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या या बंदरामधून जगभरात मालाची आयात-निर्यात केली जाते. गुजरात-राजस्थानसह उत्तर भारतातून जगभरात जाणाऱ्या आणि जगभरातून येणाऱ्या मालाची वाहतूक मुखत्वे जेएनपीटी, कळंबोळी, मुंब्रा बायपासमार्गे होत असते. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंब्रा बायपास रस्त्याची निर्मिती करण्यात आली. तरीदेखील, अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा, बायपासवर होणारे अपघात या गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत. परिणामी, मुंब्रा-कौसा परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करूनदेखील नागरिकाना दैनंदिन वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

मुंब्रा-कौसा-शीळ परिसरात दिवसेंदिवस वाढणारे नागरीकरण त्याअनुषंगाने होणारी दुचाकी-चारचाकी वाहनांची वाढ; मुंब्रा बायपासवर भविष्यात वाढणारी अवजड वाहनांची संख्या विचारात घेता मुब्रा बायपासला पर्यायी रस्त्याची नितांत गरज आहे. आत्माराम पाटील चौक ते कल्याण फाटा दरम्यान ५.६ किमी लांबीचा दुपदरी भुयारी मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित केले आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी याबाबत चर्चा झाली असता त्यांनी या प्रकल्पासाठी अनुकूलता दर्शविली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३५० कोटींचा निधी या प्रकल्पाला देण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी सर्वेक्षणदेखील झाले असून ऐरोली-कल्याणफाटा या मार्गाला हा रस्ता जोडण्यात येणार आहे.